बुधवार, २० जुलै, २०१६

अनोळखी भेट

संध्याकाळची वेळ होती. सासवड हडपसर रोड वर तशी रोजच्या सारखीच गर्दी होती. आज ती गर्दी जरा वेगळी होती. एरवी तिकडून हडपसरला येणाऱ्या एस.टी. नि आजच्या या मधेच मुख्य म्हणजे गर्दी जास्त होती. त्याला निमित्त पण म्हणा तसाच होत. नुकतीच आषाढी वारी संपली होती म्हणून पंढरपूरहून पुण्याला यायला शासनाने "ज्यादा" एस.टी. नेमल्या होत्या. माझा भाऊ फलटणहून येणार असल्याने त्याला गाडीतळावरून घ्यायला मी तिथं त्याची वाट पाहत उभा होतो. जेमतेम 50-52 वयातला एक माणूस त्याच्या ग्रामीण भाषेतून हातात तो जुना नोकिया चा मोबाईल असलेला कुणाशी तर बोलत समोरून इकडे तिकडे जात होता. सारख्या गाड्या तर रोडला होत्याच पण नुकतीच शाळा सुटायची वेळ असल्याने लहानमुलांपेक्षा त्यांना न्यायला आलेल्या पालकांचाच गोंगाट खूप जाणवत होता. मी मात्र कशाचीही तमा नसलेल्या त्या बेभान लहान मुलांकडे पाहण्यात विशेष मग्न असताना अचानक तो केविलवाणा आवाज मला अगदी जवळ जाणवू लागला. "अरे एस.टी. ने हितच सोडलंय, हिकडून कस म्या यीवू? " हा आवाज ऐकताच व्हाट्सएप मेसेंजर बंद करून मी पाठीमागे वळून पाहिले. का कुणास ठाऊक हा आवाज मला काहीतरी जवळीक असल्याचा भास जाणवून निघून गेला. मी त्यांचं फोनवरील बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागलो किंबहुना मी हून त्यांचं बोलणं कधी संपतंय याची वाट पाहत होतो. एव्हाना त्यांचं ते तेवढाच बोलणं मला सांगून गेलं की गेली महिनाभर वारी करून आलेले हे काका आज पुण्यात आले आहेत अन त्यांना त्यांचा मुलगा न्यायला आलाय. कदाचित ते नेमके कुठे उभे आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून पलीकडच्याला समजले नसेल. मी गाडीवरून बाजूला येऊन जवळ आलेल्या काकांना म्हटलं " द्या काका मी सांगतो, मी बोलतो " अस सांगून मी त्यांच्या मुलाला गाडीतळावर पोलीस चौकीजवळ यांना घेऊन येतो असं सांगितलं. एवढ्यातच झटका बसेल अशी अजून एक गोष्ट माझ्यासोबत घडली, फोनवर बोलत असतानाच शेजारी कोणतरी जवळ येऊन उभं राहिल्याचं जाणवलं ते तेवढ्या वेळ माझ्या जवळ उभं होत जेवढ्या वेळ मी फोनवर बोलत होतो. खरतर ही जाणीवच खूप भयंकर असेल तेव्हा की अनोळखी कोणतरी उगीच कोणत्या कारणाने असं आपल्याकडे पाहत असेल नि ते पण एवढ्या जवळ येऊन. ती व्यक्ती एक महिला होती अंगावर साधारण रंगाची साडी ,डोक्यावर घेतलेला पदर ,तोच पदर पुढे घेऊन त्याचे टोक दातात पकडलेलं. पायात पण अगदी साधारण चपला होत्या.

फोनवरच बोलणं संपेपर्यंत मला समजून आलं की हे दोघे पण पती पत्नी आहेत ते. किती साधे पण होत त्या दोन्ही चेहऱ्यात , त्या दिवशी एकाच वेळी मी दोन पद्धतींची निरागसता अनुभवत होतो. शाळेतून घरी जाणारी लहान मुलं, आपल्या लहान भावंडांसोबत रस्ता पार करणारी ती चिमुरडी मुलं तर दुसरीकडे एवढा लांबीचा प्रवास करून अनोळख्या ठिकाणी आलेलं ते साधारण जोडपं , दोघांच्यापण चेहऱ्यावर ते तेज दिसत होत मुलांना कधी घरी जाऊन आईला मिठी मरीन याची घाई बहुदा झाली असेल तर अनोळख्या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या मुलाला कधी भेटतोय असं या जोडप्याला वाटत असेल. मला हे सगळं जरी नवीन नसलं तरी मात्र आज हे सार खूप छान वाटत होत.


मी काकांना म्हटलं "इथून समोर जा नि पुढे गेल्यावर पुलाखाली थांबा, तुमचा मुलगा येईल तिथे ." असं म्हणून मी पाठीमागून येणाऱ्या एस.टी. ची वाट पाहत उभा राहिलो. पण त्या दोघांना तशा अवस्थेमध्ये सोडून मला काय जाऊ वाटत न्हवत. एक जण असता तर गादीवर सहज सोडले असते मी, पण त्या दोघांना सोबत त्यांच्या सामानाला कस घ्यायचं ? नि जर एकाला घेऊन जातो स्टॊप वर तोपर्यंत दुसऱ्याला काय वाटेल हा पण विचार माझ्या मनात होता. शेवटी काकाच म्हंटले , तू बस ग गाडीवर, मी येतो मागंन..असं म्हणून त्यांचा एक महिन्याचा संसार त्यांनी गाडीवर माझ्याकडे दिला. गाडीसमोरील जागा सामानाने भरली. पाठीमागे मावशी बसल्या. एवढ्यावर विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर अन पदराचे टोक ते दातात पकडलेलं अजून होत तसंच होत. काकांनी एक पोट खांद्यावर उचलायला घेतलं आणि अजूनही शांत असलेल्या मावशीने म्हटलं "आव ,तुम्ही बी बसा की". हे ऐकून मी जरा दचकलोच कारण अगोदरच सामान खूप होत ,त्यात गर्दीच्या जागी तिघे कस जाणार ना , मला वाटलं आता काका ओरडतात की काय मावशी वर त्या , पण तेवढ्याच नाजूक आवाजात काकांनी या निरागस प्रश्नाला उत्तर दिलं . अग हे काय आपलं गाव न्हाय ,पोलीस धरत्याल की आपल्याला असं म्हणून ते जा म्हटले. मी आपला त्यांना पुढं येऊन थांबा म्हणून हळू हळू गाडी चालवू लागलो.त्या मावशीच लक्ष सगळं पाठीमाघून येणाऱ्या आपल्या नवऱ्या कडे येतोय.


आजकालच्या मॉडर्न युगात प्रेमाची खरी व्याख्या मला ते दोन वयस्कर जीव शिकवू पाहत होते. प्रेम म्हणजे काळजी ! आणि आम्ही पुलाखाली येऊन थांबलो. पोलीस चौकी समोरच होती. पावसाची रिमझिम चालू असल्यानं तिथंच आडोश्याला उभं राहणं मला जास्त सोयीस्कर वाटलं. मी गाडी बाजूला लावून सामान खाली उतरवले. विशेष म्हणजे मावशी अजुनपण पाठीमागेच पाहत होत्या. "स्मार्ट सिटी मध्ये हे निरागस जीव " मला खूप कौतुक वाटत होत. साधी मानस अशीच असतात. काकापण पाठीमागून जवळ पोहचले. मी परत त्यांच्या फोनवरून त्यांच्या मुलाला कुठं उभं राहिलोय हे नीट सांगितलं तो जवळच होता आसपास. एवढ्यात त्या काकांनी प्रश्न विचारला, कुठशी जॉब करताय? आता म्हटलं यांना काय कळणार ना इंजिनीरिंग ? आपलं त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं म्हणून मी म्हटलं मगरपट्टा IT पार्क ला आहे, हे ऐकून कदाचित जास्त माहीत असलेल्या सारखं त्यांनी विचारल कोणत्या शाखेतून केलं इंजिनिरिंग? मी अवाक होऊन तोंड प्रश्न चिन्हांनी भरल्या सारखं त्यांना कॉम्पुटर इंजिनिरिंग म्हटलं. एवढ्या वेळ ज्याला अडाणी समजत होतो, जास्त शिकलेला नसेल असं समजत होतो आता तोच माणूस मला कोणीतरी विशेष वाटत होता. अंगावर मळकी कपडे, दाढी पांढरी झालेली, सामान पण असाच गाठोड्यात भरलेला माणूस आता त्याच्या या प्रश्नांने खरंच मला अधिकच भारावून टाकत होता. त्याच शिक्षणाबद्दल च ज्ञान त्याच्या एक प्रश्नात मी हेरलं होत. माझ्याकडे मिश्कीलपणे पाहत, हातातला मोबाईल हळुवार वरच्या खिशामध्ये कोंबत त्याने छाती मोती करून व अभिमानाने सांगितलं , "माझा बी पोरगा इंजिनेर हाय , इथंच कंपनी हाय त्याची, त्योच येतोय न्यायला"..अवघ्या दहा मिनिटामध्ये या साधारण माणसाने दिलेला हा विशेष असा दुसरा सुखद धक्का होता माझ्यासाठी. तेवढ्यात दोघे मायबाप चमकले आणि लांबून येणाऱ्या त्यांच्या मुलाकडे हातवारे करू लागले. अरे वा..किती छान क्षण होता तो. आई वडिलांना दुरून पाहून मुलगा पण हसत समोर येत होता. किती साधारण दुनिया यांची. पण मुलाला साहेबाच्या कपड्यात न आई बापाला साधारण कपड्यात मी पाहत होतो. आता तो मुलगा कोण असेल , जवळ येऊन तो काय करेल याचा विचार मी करत होतो. तो आला नि चक्क त्या माउलींच्या चरणी त्याने नमस्कार केला. दोघे जण आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायला पुढे झुकले. मी हे पाहतोय खरं पण आजकालच्या ब्रँडेड दुनियेत संस्कारांची किंमत अजून तशीच बहुमूल्य ठेवणारी साधीच लोक मी जवळून पाहत होतो. हा कोणताही दिखावा न्हवता, तो मुलगापण कोण असेल हे मला माहीत न्हवत पण तो जोपण असेल आज माझ्यासाठी खूप मोठा आदर्श होऊन गेला होता तो.


हे सगळं होत असताना मावशी म्हणाल्या, "काय व तुम्ही कस काय पाव्हण्यानं वळखलं? " काकांनी माझ्याकडे पाहिलं नि म्हणाले पाव्हणं कुठलं ग ? मदत करत्यात ते आपल्याला ,एवढ्या गर्दीच्या पण ठिकाणी पांडुरंग येतो मदतीला. मी हसलो न म्हटलं अहो असं काय म्हणता काका, माझे आई वडील असते तर नी का मी अशीच मदत केली असते ना आणि आभार व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी त्यांच्या मुलाला मला चहा घेऊ असं सांगितलं. मी नको म्हटलं. आता मी त्या मुलाशी बोलत होतो. मी हात मिळवून भेटून छान वाटलं म्हटलं. मधेच काका म्हणाले अरे यांनी पण कॉम्प्युटर इंजिनेरींग केलंय. आपल्याच क्षेत्रातील माणूस भेटल्याने तो हसला. अजून पण त्याने त्याच्या बद्दल काहीच सांगितलं न्हवत. त्याने मला विचारल्यानंतर मी सांगितलं अशा अमुक कंपनी मध्ये काम करतोय ,असं तस म्हणत थोड्यात मी त्याला समजेल असं सांगितलं. त्याला पण नक्की समजलं बिचारा जॉब शोधतोय अजून सेट नाही. एवढ्यावर तो थांबला अन म्हणाला , खराडीला माझ्या दोन कंपनी आहेत गेली चार वर्षांपासून मी चालवतोय. हे ऐकून मला या पूर्ण कुटुंबाचा अधिकच अभिमान वाटत. तो पुढे म्हणाला माझा नंबर घे नि इंटरव्हिव ला ये. धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच
 एका आधाराची गरज जाणवते. धावपळ करणाऱ्या शक्यतो जॉब साठी तणतण करणाऱ्या लोकांना असा सकारात्मक मदतीचा हात हवा हवासा वाटतो. आज बहुतेक माझ्यासाठी पण हे असेच असेल.


मी नंबर घेतला आणि त्यांना निरोप द्यायचा म्हणून त्यांच्याकडे पाहू लागलो. काही वेळापूर्वी एस.टी. तूं उतरलेलं, नेमका पत्ता आणि कुठं उभा राहायचं हे समजत नसल्याने कावरबावर झालेलं हे जोडपं मला काही क्षणासाठी जणू विठ्ठल रखुमाई च रूप भासत होत. मी मनातूनच नमसकार केला पण तो माझ्यासाठी पुरेसा नसल्याने मी त्या देवमाणसांच्या पाया पडलो. साधी राहणीमाण असलेल्या त्या दोघ्यांच्या मुखातून यशस्वी हो ! हे उद्गार असा आशीर्वाद मला मिळाला. मी कितीतरी वेळ या 'अनोळखी भेटी" मध्ये मग्न होत गेलो. पावसाच्या रिमझिम सरी एव्हाना शांत होत होत्या , अंधार पण हळू हळू पसरत होता आणि मी पाहत होतो त्या जीवांकडे ज्यांनी कष्टाने एक रोपटं लावलं होत जे एवढं पसरलं होत.एक यशस्वी व्यक्तिमत्व बनलं होत. मोठ्या शहरामध्ये राहूनसुद्धा संस्कार, तो आदर सगळं काही या रोपट्याने तसंच सांभाळलं होत. कदाचित हे सगळं पाहून या वर्षीची आषाढाची वारी सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असं वाटत असावं त्यांना.


-मोहनिश महंमद खुंटे.
18-07-2016