गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

बघ अशी बनते कविता...........



सरळ साधे शब्द सुचले
एका चालीत त्यांना गुंफले
हवा तसा तिथे दिला स्वल्पविराम
संपता सगळे शेवटी पूर्णविराम
बघ अशी बनते कविता...........

इकडच्या तिकडच्या गोष्टी मधला अर्थ तेवढा समजून घ्यावा ..
हवा तसा आणि वाट्टेल तसा पण जपून एखादा शब्द द्यावा..
कोणाला आवडले तर मिळेल वाहवा!
नाहीच आवडले तर पुन्हा एकदा पूर्णविराम द्यावा..
बघ अशी बनते कविता...........

शब्दांचा त्यांचा अर्थांशी मुळातच हा लपाछपीचा खेळ
समानार्थी नि विरुद्धार्थी सोबत शब्दालंकाराची ही फक्त एक भेळ
ओढून ताणून शब्द आणण्या कधीच घालवू नये व्यर्थ वेळ
योग्य ठिकाणी योग्य भावनांचा घालावा लागतो अचूक मेळ
बघ अशी बनते कविता...........

मोहनिश महंमद खुंटे

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

आवडतं मला !!

माझी तुझी ओळख नवी
नवी आहे ऋतूची छवी
तुझ्याशी थोडं कमीच बोलावं
थोडेसेच ते पण खूप काही त्यातून सांगावं..............आवडतं मला !!


तुला चिडवावं, डिवचाव, भांबावून सोडावं
तू ओरडावं आणि मी शांत व्हावं
तुझ्यासोबत चालताना बेभान मी बनावं
तू थांबवावं अन मी थांबावं ...........आवडतं मला !!


तू रुसली असता मी मनवावे अनेकदा
तू धरता अबोला मी म्हणावे बोलना गं एकदा
मी नसता फोन उचलता तू दुसऱ्यांदा करावा
मी मागावी माफी अन पारा तुझा चढावा.......आवडतं मला !!

-मोहनिश महंमद खुंटे
05/09/2017

गुरुवार, २७ जुलै, २०१७

माणूस : माळावरचा दगड

भेगांना  माझ्यावरच्या कधी अस्तित्व माझे न कळले
मुक्यापणाचे जीवन माझे एकाच जागी झिजले


संभ्रमात त्या अफाट ताकदीच्या बुडून मी जगलो
असंख्य वादळ झेलले अन शतदा मी झिजलो
आसऱ्यास माझ्या न जाणो किती पुष्प सजले
मुक्यापणाचे जीवन माझे एकाच जागी झिजले


उनाड माळरानावरती शेंदूर लागून देव मी झालो
भाबड्या त्या इच्छांकरिता चमत्काररूपीच  मी उरलो
नवसापोटी माझ्यासमोरील शेकडो दिवे विझले
मुक्यापणाचे जीवन माझे एकाच जागी झिजले


होऊनि एखादा भूकंप तुटून मी जाऊ म्हणतो
बनुनी खडे जमिनीवरती इतरत्र साऱ्या पसरू म्हणतो
कोणी उचलेल फेकुनि मारेल पण या जागेवरून एकदाचा निघेल म्हणतो
एकाच जागीचे जीवन माझे जगभर साऱ्या बिखरू म्हणतो..

-मोहनिश महंमद खुंटे

सोमवार, १७ जुलै, २०१७

माणूस :माळावरचा दगड

माणूस :माळावरचा दगड


माणूस  हा बऱ्याचदा  त्याचे जीवन त्याच्या सध्याच्या स्थितीनुसार  कोणत्याना कोणत्या गोष्टी मध्ये पाहत असतो. कधी खूप आनंदी असतो तेव्हा त्याला दिवाळी असल्याचा भास होतो तर कधी भरल्या घरात दुःख आले तर तो शिमग्यासमान तोंड करून बसतो. सगळं काही चांगलं होत असताना त्याच्या कृतीमधूनसुद्धा त्या सकारात्मक लहरी पसरू लागतात तर कोणत्या चिंतेमध्ये तो सरळ साधारण गोष्टीसुद्धा चुकून बसतो. रिकाम्या वेळात कधी मोकळ्या आकाशात पाहत बसला तर तो त्याच्या मनातल्या कल्पना त्या येणाऱ्या जाणाऱ्या ढगांमध्ये गुंफू लागतो. तर कधी किर्रर्र रात्रीमध्ये तो चांदण्यांना जोडून निराळ्या गोष्टी जोडत बसतो.हे तुम्ही आम्ही सार्यांनी अनुभवलं आहेच बऱ्याचदा ! पण आयुष्यात असेही काही प्रसंग घडतात त्यात माणूस स्वतःच आयुष्य सभोवतालच्या गोष्टींसमान पाहू लागतो. अशावेळी छोटी मुंगी सुद्धा कधी त्याला जगण्याच शास्त्र शिकवून जाते तर कधी वाहणार पाणी पण खूप काही सांगते.तसं पाहिलं तर माळरानावरच्या मोठ्या दगडांकडे आपण खूप वेळा पाहिलं असेल मी सुद्धा पाहिलं पण हा दगड मला काहीतरी शिकवेल हा मी विचार न्हवता केला कधी. लहानपणापासून पाहत आलेलो हा दगड बहुदा मला माझीच सध्याच्या स्थितीची जाणीव तर करून देत नसेल ना असा प्रश्न मला पडतो. तो तसाच असतो स्तब्ध ! निर्जीव..एकाच जागी अगदी जशाचा तसा... कदाचित आपण पण आपल्या जीवनात एका ठराविक गोष्टीच्या बांधील होऊन जातो अन तेच आपलं आयुष्य होऊन जातं. घर-ऑफिस-घर असा एखाद्या गावचा बस प्रवास आपला सुरु होतो आणि आपण पण काही काळानंतर स्थब्ध होऊन जातो .संसारातील जबाबदाऱ्या ,कुटुंबातील प्रत्येकाचे ठरलेले काम करत करत बराच काळ आपला निघून जातो. मग ती चाकोरी जी किंबहुना आपणच आपल्या जीवनासाठी बनवलेली असावी त्यामध्ये मग हळू हळू आपण अडकू लागतो. मग सरतेशेवटी जेव्हा हे आयुष्य हा सारीपाट कंटाळवाणा वाटू लागतो तेव्हा आपण नक्कीच विचार करतो कि काही वर्षांअगोदर आपण जे होतो ते नेमके कुठं सोडून इथपर्यंत पोहचलो. खर असेल वा नसेल अनुभवाच्या कमतरतेमुळे मी सांगू शकणार नाही पण हि चाकोरी तोडून सगळ्यांना बाहेर पडू वाटत ..आपलं स्वतःच अस्तित्व पुन्हा एकदा नव्याने शोधण्यासाठी !!
त्या दगडालापण वाटावं आपण तुकड्यांमध्ये का होईना तुटावं !!
निरर्थक हा जन्म माझा यातून एकदाच सुटावं !!


-मोहनिश महंमद खुंटे

१६-०७-२०१७

मंगळवार, ११ जुलै, २०१७

माती आणि धागा

धागा म्हणाला मातीला किती लाजिरवाणं तुझं जीवन..
लोकांच्या पायदळी तुडवून कसं काय मिळत तुला देवपण…


माती म्हणाली धाग्याला तुझं भविष्य काय असेल तू जाणतोस का?
कधी होतोस वस्त्र तर कधी चिंधी सांग मग तू जगतोस तरी का?


धागा म्हणतो, वस्त्र ?काय त्या वस्त्राची किंमत सांगू तुला कोण अबला नारी बे अब्रू होताना..
त्यापेक्षा आवडेल मला चिंधी बनून कुठेतरी काटेरी झुडुपावर लटकताना..


माझं  भाग्य मोठं मी देवाची मूर्ती होते..समाजात एका उच्च  स्थानी प्रतिष्ठापना माझी होते
कधी  कोणा थोर पुरुष्याच्या पुतळ्याला शेण लावलं जात तर विटंबना पण माझीच होते..


धागा म्हणतो, अगं कंटाळलो मी या दुनियेत भगवा पिवळा हिरवा निळा रंग बनून माणसं दुभागताना ..
पण अभिमान होतो तिरंगी कफन म्हणून शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्राला कवटाळून घेताना.


माती शेवटी म्हणाली धाग्याला.तुझं माझं अस्तित्व तरी बघ ना..कधी तू माझ्यात मिसळतो तर कधी मी तुझ्यामध्ये बांधून नेली जाते...
..स्वार्थी घमेंडी या दुनियेत शेवटी सगळ्यांचीच माती होते !!!


-मोहनिश महंमद खुंटे
11-07-2017

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

मिळविण्या तुझ्यातले माझेपण मी लाख खटाटोप करतो..
ना सापडले मला कधी ते..... मी माझा कणभर पण ना उरतो..

-मोहनिश महंमद खुंटे

आईविषयीच्या कविता रचण्या शब्दही माझे थर थर कापत राहतात..,
तिच्या मायेला आकाशाची उपमा दिली तर तेही ठेंगणे पडेल या भीतीने !!

-मोहनिश महंमद खुंटे

गुरुवार, ९ मार्च, २०१७

तुझ्या ओठी गीत माझेच यावे......

मनाने मनाशी असे काय बोलावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे
गीताची ती  धून सुमधुर व्हावी
ऐकताना  ते भान माझे हरावे…...

भांडावे फुगावे तुझ्याशी रुसावे
मज पाहून हसू तुझ्या गाली फुलावे
अबोला क्षणाचा मग पुन्हा जुळावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….

असताना मी दूर जवळी तू यावे
नसताना कधी तू भास तुझेच व्हावे
सोबतीत तुझ्या मी मलाच हरवावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….

क्षणाक्षणाला ओढ तुझीच लागे
सुटता सुटेना हे विरहाचे धागे
तुझ्याविना मी असा होई वेडा
जशी धावे सावली उन्हाच्या मागे….

एकांतात बसुनी मी तुलाच आठवावे
जागोजागी मी तुलाच पाहावे
मनाने मनाशी असे काय बोलावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….


-मोहनिश महंमद खुंटे ०९/०३/२०१७

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

शिंपला

शिंपला

सागरातून एक शिंपला मी आणला
कधी तिची सोबत तर कधी तिच्या आठवणीसाठी सतत जवळच त्याला ठेवला

शिंपल्यामागच्या रहस्यात प्रेम माझं लपलं होत
मंद मंद लाटेच्या सानिध्यात मिठीत तिला मी घेतलं होत

शिंपल्याचीच एक माळ तिच्या गळ्याभोवती मी माळली होती
नजरेला नजर भिडताच गालातच ती लाजली होती

किनाऱ्यावरती बसून रेतीमध्ये घर आम्ही बांधलं होत
शिंपल्याचंच पण देखणं कुंपण त्याच्याभोवती रचलं होत

अजूनही त्या गोड आठवणींमध्ये डोळे आसवांनी भरल्याशिवाय राहत नाहीत
स्वाती नक्षत्रातील पावसाच्या त्या थेंबांशिवाय शिंपल्यातून मोती कधीच मिळत नाहीत...


- मोहनिश महंमद खुंटे
31-01-2017



गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

पाहिलंय मी तिला............



पाहिलंय मी तिला माझ्यापासून दूर होताना,
माझ्याचसामोरून जाताना पण कोणा दुसऱ्याच्याच हाती हात तिला देताना...

पाहिलंय मी तिला पावसामध्ये चिंब भिजताना,
डोक्यावरची छत्री हवेत सोडून मिश्कीलपणे कोणा दुसर्यालाच सॉरी म्हणताना...

पाहिलंय मी तिला साज शृंगार करताना ,
अंगावरची पैठणी कोणा दुसऱ्याच्याच आवडीची घालताना...

पाहिलंय मी तिला हळुवार लाजताना,
 गालावरील खळीला कोणा दुसऱ्याच्याचसाठी खुलवताना...

पाहतो  मी तिला नकळत रडताना ,
कपाळावरील कुंकू कोणा दुसऱ्याच्याच नावाचे लावताना...



- मोहनिश महंमद खुंटे१२-०१-२०१७