शुक्रवार, २४ मार्च, २०१७

मिळविण्या तुझ्यातले माझेपण मी लाख खटाटोप करतो..
ना सापडले मला कधी ते..... मी माझा कणभर पण ना उरतो..

-मोहनिश महंमद खुंटे

आईविषयीच्या कविता रचण्या शब्दही माझे थर थर कापत राहतात..,
तिच्या मायेला आकाशाची उपमा दिली तर तेही ठेंगणे पडेल या भीतीने !!

-मोहनिश महंमद खुंटे

गुरुवार, ९ मार्च, २०१७

तुझ्या ओठी गीत माझेच यावे......

मनाने मनाशी असे काय बोलावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे
गीताची ती  धून सुमधुर व्हावी
ऐकताना  ते भान माझे हरावे…...

भांडावे फुगावे तुझ्याशी रुसावे
मज पाहून हसू तुझ्या गाली फुलावे
अबोला क्षणाचा मग पुन्हा जुळावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….

असताना मी दूर जवळी तू यावे
नसताना कधी तू भास तुझेच व्हावे
सोबतीत तुझ्या मी मलाच हरवावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….

क्षणाक्षणाला ओढ तुझीच लागे
सुटता सुटेना हे विरहाचे धागे
तुझ्याविना मी असा होई वेडा
जशी धावे सावली उन्हाच्या मागे….

एकांतात बसुनी मी तुलाच आठवावे
जागोजागी मी तुलाच पाहावे
मनाने मनाशी असे काय बोलावे
तुझ्या ओठी गीत माझेच यावे….


-मोहनिश महंमद खुंटे ०९/०३/२०१७