मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

"आई" शब्द जेवढा महान आहे तेवढंच महान आहे आई होणं. आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ जन्माला   
येई पर्यंत एक वेगळीच आतुरता प्रत्येक आईच्या मनात असते. ९ महीने आणि ते प्रत्येक दिवस हि आतुरता वाढतच जाते आणि कधी कधी हा जीव आई म्हणून हाक मारतोय याचे भास वाटायला सुरुवात होते....हेच भास आणि हीच आतुरता आई होणाऱ्या माझ्या मैत्रिणीच्या मनातून कवितेमधून मांडत आहे.....

इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई !


देहातून माझ्या हळूच हाक येई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

अंगणातील मोगऱ्याच्या कळीचे होई फुल
हालचालीतून हा जीव देई त्याच्या येण्याची चाहूल
सायंकाळच्या वेळी वासरू गायीजवळ जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

बिजातूनी अंकुर बनून येईल तो तान्हा
चार भिंतीच्या घरट्यात रांगेल माझा कान्हा
मिठीत त्याला घेण्या मग जीव करी घाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

बोबड्या शब्दांना ऐकण्या आतुरले माझे कान
अवतीभोवती त्याच्या असण्यात हरपून जाई भान
पोट भरण्या लेकरा ती दोन घास कमी खाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

पणतीच्या तेलासोबत आजन्म जळतात वाती
मडक्याच्या घडण्यासाठी जळून घेते माती
घरट्यात नसता बाळ पाखरू घाबरून जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई


- मोहनिश महंमद खुंटे
२७-१२-२०१६



सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..............................

असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..............................

त्याचा जन्म झाला तेव्हा ते सगळे म्हणाले नक्कीच काहीतरी नाव कमवेल असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


पुढे अवघ्या 3-4 वर्ष मध्ये तो इतका बोलायचं की ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा नेता बनणार असं
त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


शाळेत जायला लागल्यावर घरी रोज न सांगता अभ्यासाला बसायचं,सगळ्या विषयात उत्तम मार्क्स मिळवायचा तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा Doctor बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


दहावीच्या वर्षात अभ्यासासोबतच प्रेम करायला लागला, जेव्हा हे समजलं तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच
पुढे जाऊन हा प्रेम विवाह करणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


पुढचं शिक्षण घ्यायला शहरामध्ये कॉलेजला जाऊ लागला, मित्रांच्या सोबतीतून घरी भांडण घेऊन यायला लागला सुजलेल्या थोबाडाकडे पाहून तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा गुंड बनणार असं त्याच्या
तोंडाकडे बघून वाटतंय..


शिक्षण सार संपवून जेव्हा नोकरीसाठी वण वण भटकून मोकळ्या हाताने घरी यायचा तेव्हा ते सगळे
म्हणायचे असाच बोंबलत बसला तर नक्कीच पुढे जाऊन बेरोजगार होणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय
..


बेरोजगारीवर मात देऊन कष्टाची सोबत घेऊन IT कंपनी मध्ये जॉब करत असतो ,प्रामाणिकपणा त्याचा पाहून
ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा मॅनेजर बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


कंपनी मधल्याच एका मुलीशी लग्न करून तो संसार त्याचा सुखाने सजवू लागतो, असच अचानक हसरा त्याचा चेहरा
पाहून ते सगळे म्हणायचे नक्कीच हा बाप बनणार आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

नोकरीतील उच्च पदाचा फायदा आणि त्याची मेहनत त्याला परदेशात नोकरीसाठी संधी देते, तो ही बायको
मुलांसोबत तिकडे जायला तयार होतो तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच हा आई बापाला वृद्धश्रमात टाकणार
आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

एवढं सगळं घडत असताना त्याचे जीवन तो आंनदाने जगतच असतो, ते सगळे असतातच त्याच्या चांगल्या
वाईटावर फक्त बोलणारे, फुकटचे उपदेश देणारे पण तो मात्र जात राहतो पुढे पुढे या सगळ्यांशी कानाडोळा करत.ते सगळे काय म्हणतील याचा विचार न करता ! चांगलं झालं तरी ते सगळे बोलणारच आणि वाईट झालं  तरी ते सगळे बोलणारच!!

मिळालेले आयुष्य समाधानाने जगून शेवटी तो या नश्वर दुनियेचा निरोप घेतो,देहापासून जरी त्याचा आत्मा त्याला सोडून गेला होता तरी समाधानी चेहऱ्याकडे पाहून ते सगळे म्हणायचे झोपेतून हा उभा राहील असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

म्हणून एखादी गोष्ट करताना कुणी काय म्हणेल याचा जास्त विचार न करता ती गोष्ट कशाप्रकारे जास्त चांगली होऊ शकेल याचा विचार करावा कारण ,ते सगळे तुम्हाला नेहमीच भेटतील तुमच्या आसपास जे फक्त बोलणार्यांची भूमिका बजावत असतात !!!


- मोहनिश महंमद खुंटे.

12-12-2016

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा......

गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा
नजरेच्या इशाऱ्यातून अन अलगद स्पर्शातून लाज होई आपोआप वजा..

पहाटेच्या धुकयांमध्ये चढते खरी शराबीच नशा
कळ्यासुद्धा दवासंगे पाकळ्यांना भेटाया येति तरी कशा….
अशामध्ये चुकलं कुणी प्रेम करायला तर द्यायची नसते सजा..
गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा..

सकाळच्या उन्हाची किरणेसुद्धा भासू लागतात सोनेरी..
उबदार पांघरूनही  जणू वाटे मखमल भरजरी..
उठू नसेल वाटत तर तसेच खूप वेळ निजा..
गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा..

थंडीमध्ये सोबत फिरताना असते खांद्यावर डोके नि हात हातात
थोडी काळजी घ्या बरं का कारण सगळे आपल्याकडेच पाहतात
रोज रोज च्या त्या कामाना द्या आता तरी रजा…
गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा..

दुपारजेव्हा होते तेव्हा असतो सूर्य आकाशी
देह जरी असला घरी तरी मन मात्र असते कोणा दुसर्याचपाशी
लक्ष द्या त्याच्याकडे होऊ नका देऊ कोणती इजा
गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा..

रात्रीच्या थंडीत करू वाटते शेकोटी..
गार वाऱ्यासोबत सुरु होते खरी कुडकुडतच कसोटी
शेकोटीसमोर रंगलेल्या गाण्यांच्या मैफिलीत आतातरी भिजा
गुलाबी थंडीची गुलाबीच असते मज्जा..


-मोहनिश महंमद खुंटे
१६/११/२०१६

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

वाटलेच कधी तुला.................!

वाटलेच कधी तुला रचावे काही 
तर शब्द मी व्हावे कवितेतील तुझ्या !

वाटलेच कधी तुला गुणगुणावे काही 
तर धून मी व्हावे गीतातील तुझ्या !

वाटलेच कधी तुला उत्तुंग उडावे 
तर नभ मी व्हावे आकाशातील तुझ्या !

वाटलेच कधी तुला घ्यावी उंच भरारी
तर बळ मी व्हावे पंखातील तुझ्या !

वाटलेच कधी तुला डुंबावे होऊनी स्वच्छंद 
तर जल मी व्हावे प्रवाहातील तुझ्या !

वाटलेच कधी तुला फिरावे बागेतूनी
तर फुलपाखरू मी व्हावे फुलांतील तुझ्या !

वाटलेच कधी तुला भिजावे चिंब पावसात 
तर थेंब मी व्हावे सरीतील तुझ्या !

वाटलेच कधी तुला चालावे अंधारातूनी
तर काजवे मी व्हावे रस्तातील तुझ्या !

वाटलेच कधी मनी निराशपण तुझ्या
तर सहवास मी व्हावा एकांतातील तुझ्या !

कधी वाटलेच तुला जगताना एकटे
तर सावली मी व्हावे देहाची तुझ्या !!!

-मोहनिश महंमद खुंटे

27.10.2016

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

ही चाहूल नव्या प्रेमाची पण शब्द झाले मुके !


पावसामध्ये तो थंड वारा
सोबतीला दाठ धुके
ही चाहूल नव्या प्रेमाची 
पण शब्द झाले मुके !

संथ या सरींमध्ये झाले ओले चिंब तुझे अंग 
नशा या मंद हवेची त्यात गुलाबी तुझ्या ओठांचा रंग !

सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहण्या बेभान वारासुद्धा होई मंद  
सभोवताली हिरवा निसर्ग हा उभा 
पण मन मात्र होई फक्त तुझ्यातच दंग!

वळ्णावरच्या रस्त्यांवरती लवलवती भाताची ही शेत 
स्पर्शाने तुझ्या कैद होई मनी आपली ही भेट !

गाणे तुझ्या मुखातूनी सुरेल तेव्हा वाटे 
उन्ह सावल्यांच्या खेळामध्ये जेव्हा ढग आकाशामध्ये दाटे !

हिरवीगार टेकडी सुद्धा धुक्याने न्हाऊन गेली
भिजलेल्या तुझ्या गालांवर जेव्हा नकळत लाली आली !

ढगांशी बोलायला आज वीज बघ लुकलुके
अन मनातील गुपित तुला सांगायला शब्द माझे झाले मुके !!

-मोहनिश महंमद खुंटे

20.10.2016


"पावसाळा संपून आता रोजच्या उन्हामध्ये गुलाबी थंडी जाणवायला सुरवात व्हायला लागली आहे..पण ऐन पावसाळ्यात लिहायला घेतलेली कविता आज पावसाळ्यासोबतच संपवली !!

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी.!

अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी.!
मनातल्या बऱ्याच कोंडून पडलेल्या भावना मोकळ्या होताना पाहायचं असल्यास..


गर्दीतून कधी तो चेहरा दिसावा ज्याला अनपेक्षितपणे का होईना नजर शोधत राहते नेहमी!
कानावर अचानक आपल्याच नावाचे शब्द घुमावे जेव्हा त्याच्याकडून आपले नाव ऐकायला मिळावे असं कधी वाटल्यास..


फोन आलाच कधी अनोळखी नंबर वरून तर त्यातील शेवटचे काही नंबर अगदी सारखेच निघावे त्याच्या असणाऱ्या जुन्या मोबाइल नंबर सारखे!
मग मुद्दामून  तेच ते  मेसेजेस  वाचावे जुन्या आठवणींना उजाळा द्यावा वाटल्यास..

आपल्याला आवडत असणाऱ्या कित्येक रंगांपेक्षा मग कधी त्याला आवडणाऱ्या रंगामध्ये रंगून जावं..!
मग जुना झाला असला तरी तोच ड्रेस घालावा त्याच्याकडून मिळाल्याला त्या कॉम्प्लिमेंट पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटल्यास ..


एकटं वाटायला लागलं तर कधी जाऊन बसावं त्या जागी जिथं आधी कधी बसून तासंतास गप्पा मारल्या होत्या त्याच्यासोबत..!
शांत मनाने मग गवताच्या काड्या तोडत बसावं  मुजलेल्या त्या गमती जमती खोदून काढू वाटल्यास..
..
विसरला असेल तोही मला असं आपलंच आपल्याला समजावत डोळ्यातील अश्रूंना मोकळेपणाने वाहू द्यावं..!
मग थोड्या वेळाने सावरताना स्वतःनेच स्वतःलाच , असं मनात यावं ,


“अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी..”


-मोहनिश महंमद खुंटे
09-09-2016

बुधवार, २० जुलै, २०१६

अनोळखी भेट

संध्याकाळची वेळ होती. सासवड हडपसर रोड वर तशी रोजच्या सारखीच गर्दी होती. आज ती गर्दी जरा वेगळी होती. एरवी तिकडून हडपसरला येणाऱ्या एस.टी. नि आजच्या या मधेच मुख्य म्हणजे गर्दी जास्त होती. त्याला निमित्त पण म्हणा तसाच होत. नुकतीच आषाढी वारी संपली होती म्हणून पंढरपूरहून पुण्याला यायला शासनाने "ज्यादा" एस.टी. नेमल्या होत्या. माझा भाऊ फलटणहून येणार असल्याने त्याला गाडीतळावरून घ्यायला मी तिथं त्याची वाट पाहत उभा होतो. जेमतेम 50-52 वयातला एक माणूस त्याच्या ग्रामीण भाषेतून हातात तो जुना नोकिया चा मोबाईल असलेला कुणाशी तर बोलत समोरून इकडे तिकडे जात होता. सारख्या गाड्या तर रोडला होत्याच पण नुकतीच शाळा सुटायची वेळ असल्याने लहानमुलांपेक्षा त्यांना न्यायला आलेल्या पालकांचाच गोंगाट खूप जाणवत होता. मी मात्र कशाचीही तमा नसलेल्या त्या बेभान लहान मुलांकडे पाहण्यात विशेष मग्न असताना अचानक तो केविलवाणा आवाज मला अगदी जवळ जाणवू लागला. "अरे एस.टी. ने हितच सोडलंय, हिकडून कस म्या यीवू? " हा आवाज ऐकताच व्हाट्सएप मेसेंजर बंद करून मी पाठीमागे वळून पाहिले. का कुणास ठाऊक हा आवाज मला काहीतरी जवळीक असल्याचा भास जाणवून निघून गेला. मी त्यांचं फोनवरील बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागलो किंबहुना मी हून त्यांचं बोलणं कधी संपतंय याची वाट पाहत होतो. एव्हाना त्यांचं ते तेवढाच बोलणं मला सांगून गेलं की गेली महिनाभर वारी करून आलेले हे काका आज पुण्यात आले आहेत अन त्यांना त्यांचा मुलगा न्यायला आलाय. कदाचित ते नेमके कुठे उभे आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून पलीकडच्याला समजले नसेल. मी गाडीवरून बाजूला येऊन जवळ आलेल्या काकांना म्हटलं " द्या काका मी सांगतो, मी बोलतो " अस सांगून मी त्यांच्या मुलाला गाडीतळावर पोलीस चौकीजवळ यांना घेऊन येतो असं सांगितलं. एवढ्यातच झटका बसेल अशी अजून एक गोष्ट माझ्यासोबत घडली, फोनवर बोलत असतानाच शेजारी कोणतरी जवळ येऊन उभं राहिल्याचं जाणवलं ते तेवढ्या वेळ माझ्या जवळ उभं होत जेवढ्या वेळ मी फोनवर बोलत होतो. खरतर ही जाणीवच खूप भयंकर असेल तेव्हा की अनोळखी कोणतरी उगीच कोणत्या कारणाने असं आपल्याकडे पाहत असेल नि ते पण एवढ्या जवळ येऊन. ती व्यक्ती एक महिला होती अंगावर साधारण रंगाची साडी ,डोक्यावर घेतलेला पदर ,तोच पदर पुढे घेऊन त्याचे टोक दातात पकडलेलं. पायात पण अगदी साधारण चपला होत्या.

फोनवरच बोलणं संपेपर्यंत मला समजून आलं की हे दोघे पण पती पत्नी आहेत ते. किती साधे पण होत त्या दोन्ही चेहऱ्यात , त्या दिवशी एकाच वेळी मी दोन पद्धतींची निरागसता अनुभवत होतो. शाळेतून घरी जाणारी लहान मुलं, आपल्या लहान भावंडांसोबत रस्ता पार करणारी ती चिमुरडी मुलं तर दुसरीकडे एवढा लांबीचा प्रवास करून अनोळख्या ठिकाणी आलेलं ते साधारण जोडपं , दोघांच्यापण चेहऱ्यावर ते तेज दिसत होत मुलांना कधी घरी जाऊन आईला मिठी मरीन याची घाई बहुदा झाली असेल तर अनोळख्या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या मुलाला कधी भेटतोय असं या जोडप्याला वाटत असेल. मला हे सगळं जरी नवीन नसलं तरी मात्र आज हे सार खूप छान वाटत होत.


मी काकांना म्हटलं "इथून समोर जा नि पुढे गेल्यावर पुलाखाली थांबा, तुमचा मुलगा येईल तिथे ." असं म्हणून मी पाठीमागून येणाऱ्या एस.टी. ची वाट पाहत उभा राहिलो. पण त्या दोघांना तशा अवस्थेमध्ये सोडून मला काय जाऊ वाटत न्हवत. एक जण असता तर गादीवर सहज सोडले असते मी, पण त्या दोघांना सोबत त्यांच्या सामानाला कस घ्यायचं ? नि जर एकाला घेऊन जातो स्टॊप वर तोपर्यंत दुसऱ्याला काय वाटेल हा पण विचार माझ्या मनात होता. शेवटी काकाच म्हंटले , तू बस ग गाडीवर, मी येतो मागंन..असं म्हणून त्यांचा एक महिन्याचा संसार त्यांनी गाडीवर माझ्याकडे दिला. गाडीसमोरील जागा सामानाने भरली. पाठीमागे मावशी बसल्या. एवढ्यावर विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर अन पदराचे टोक ते दातात पकडलेलं अजून होत तसंच होत. काकांनी एक पोट खांद्यावर उचलायला घेतलं आणि अजूनही शांत असलेल्या मावशीने म्हटलं "आव ,तुम्ही बी बसा की". हे ऐकून मी जरा दचकलोच कारण अगोदरच सामान खूप होत ,त्यात गर्दीच्या जागी तिघे कस जाणार ना , मला वाटलं आता काका ओरडतात की काय मावशी वर त्या , पण तेवढ्याच नाजूक आवाजात काकांनी या निरागस प्रश्नाला उत्तर दिलं . अग हे काय आपलं गाव न्हाय ,पोलीस धरत्याल की आपल्याला असं म्हणून ते जा म्हटले. मी आपला त्यांना पुढं येऊन थांबा म्हणून हळू हळू गाडी चालवू लागलो.त्या मावशीच लक्ष सगळं पाठीमाघून येणाऱ्या आपल्या नवऱ्या कडे येतोय.


आजकालच्या मॉडर्न युगात प्रेमाची खरी व्याख्या मला ते दोन वयस्कर जीव शिकवू पाहत होते. प्रेम म्हणजे काळजी ! आणि आम्ही पुलाखाली येऊन थांबलो. पोलीस चौकी समोरच होती. पावसाची रिमझिम चालू असल्यानं तिथंच आडोश्याला उभं राहणं मला जास्त सोयीस्कर वाटलं. मी गाडी बाजूला लावून सामान खाली उतरवले. विशेष म्हणजे मावशी अजुनपण पाठीमागेच पाहत होत्या. "स्मार्ट सिटी मध्ये हे निरागस जीव " मला खूप कौतुक वाटत होत. साधी मानस अशीच असतात. काकापण पाठीमागून जवळ पोहचले. मी परत त्यांच्या फोनवरून त्यांच्या मुलाला कुठं उभं राहिलोय हे नीट सांगितलं तो जवळच होता आसपास. एवढ्यात त्या काकांनी प्रश्न विचारला, कुठशी जॉब करताय? आता म्हटलं यांना काय कळणार ना इंजिनीरिंग ? आपलं त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं म्हणून मी म्हटलं मगरपट्टा IT पार्क ला आहे, हे ऐकून कदाचित जास्त माहीत असलेल्या सारखं त्यांनी विचारल कोणत्या शाखेतून केलं इंजिनिरिंग? मी अवाक होऊन तोंड प्रश्न चिन्हांनी भरल्या सारखं त्यांना कॉम्पुटर इंजिनिरिंग म्हटलं. एवढ्या वेळ ज्याला अडाणी समजत होतो, जास्त शिकलेला नसेल असं समजत होतो आता तोच माणूस मला कोणीतरी विशेष वाटत होता. अंगावर मळकी कपडे, दाढी पांढरी झालेली, सामान पण असाच गाठोड्यात भरलेला माणूस आता त्याच्या या प्रश्नांने खरंच मला अधिकच भारावून टाकत होता. त्याच शिक्षणाबद्दल च ज्ञान त्याच्या एक प्रश्नात मी हेरलं होत. माझ्याकडे मिश्कीलपणे पाहत, हातातला मोबाईल हळुवार वरच्या खिशामध्ये कोंबत त्याने छाती मोती करून व अभिमानाने सांगितलं , "माझा बी पोरगा इंजिनेर हाय , इथंच कंपनी हाय त्याची, त्योच येतोय न्यायला"..अवघ्या दहा मिनिटामध्ये या साधारण माणसाने दिलेला हा विशेष असा दुसरा सुखद धक्का होता माझ्यासाठी. तेवढ्यात दोघे मायबाप चमकले आणि लांबून येणाऱ्या त्यांच्या मुलाकडे हातवारे करू लागले. अरे वा..किती छान क्षण होता तो. आई वडिलांना दुरून पाहून मुलगा पण हसत समोर येत होता. किती साधारण दुनिया यांची. पण मुलाला साहेबाच्या कपड्यात न आई बापाला साधारण कपड्यात मी पाहत होतो. आता तो मुलगा कोण असेल , जवळ येऊन तो काय करेल याचा विचार मी करत होतो. तो आला नि चक्क त्या माउलींच्या चरणी त्याने नमस्कार केला. दोघे जण आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायला पुढे झुकले. मी हे पाहतोय खरं पण आजकालच्या ब्रँडेड दुनियेत संस्कारांची किंमत अजून तशीच बहुमूल्य ठेवणारी साधीच लोक मी जवळून पाहत होतो. हा कोणताही दिखावा न्हवता, तो मुलगापण कोण असेल हे मला माहीत न्हवत पण तो जोपण असेल आज माझ्यासाठी खूप मोठा आदर्श होऊन गेला होता तो.


हे सगळं होत असताना मावशी म्हणाल्या, "काय व तुम्ही कस काय पाव्हण्यानं वळखलं? " काकांनी माझ्याकडे पाहिलं नि म्हणाले पाव्हणं कुठलं ग ? मदत करत्यात ते आपल्याला ,एवढ्या गर्दीच्या पण ठिकाणी पांडुरंग येतो मदतीला. मी हसलो न म्हटलं अहो असं काय म्हणता काका, माझे आई वडील असते तर नी का मी अशीच मदत केली असते ना आणि आभार व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी त्यांच्या मुलाला मला चहा घेऊ असं सांगितलं. मी नको म्हटलं. आता मी त्या मुलाशी बोलत होतो. मी हात मिळवून भेटून छान वाटलं म्हटलं. मधेच काका म्हणाले अरे यांनी पण कॉम्प्युटर इंजिनेरींग केलंय. आपल्याच क्षेत्रातील माणूस भेटल्याने तो हसला. अजून पण त्याने त्याच्या बद्दल काहीच सांगितलं न्हवत. त्याने मला विचारल्यानंतर मी सांगितलं अशा अमुक कंपनी मध्ये काम करतोय ,असं तस म्हणत थोड्यात मी त्याला समजेल असं सांगितलं. त्याला पण नक्की समजलं बिचारा जॉब शोधतोय अजून सेट नाही. एवढ्यावर तो थांबला अन म्हणाला , खराडीला माझ्या दोन कंपनी आहेत गेली चार वर्षांपासून मी चालवतोय. हे ऐकून मला या पूर्ण कुटुंबाचा अधिकच अभिमान वाटत. तो पुढे म्हणाला माझा नंबर घे नि इंटरव्हिव ला ये. धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच
 एका आधाराची गरज जाणवते. धावपळ करणाऱ्या शक्यतो जॉब साठी तणतण करणाऱ्या लोकांना असा सकारात्मक मदतीचा हात हवा हवासा वाटतो. आज बहुतेक माझ्यासाठी पण हे असेच असेल.


मी नंबर घेतला आणि त्यांना निरोप द्यायचा म्हणून त्यांच्याकडे पाहू लागलो. काही वेळापूर्वी एस.टी. तूं उतरलेलं, नेमका पत्ता आणि कुठं उभा राहायचं हे समजत नसल्याने कावरबावर झालेलं हे जोडपं मला काही क्षणासाठी जणू विठ्ठल रखुमाई च रूप भासत होत. मी मनातूनच नमसकार केला पण तो माझ्यासाठी पुरेसा नसल्याने मी त्या देवमाणसांच्या पाया पडलो. साधी राहणीमाण असलेल्या त्या दोघ्यांच्या मुखातून यशस्वी हो ! हे उद्गार असा आशीर्वाद मला मिळाला. मी कितीतरी वेळ या 'अनोळखी भेटी" मध्ये मग्न होत गेलो. पावसाच्या रिमझिम सरी एव्हाना शांत होत होत्या , अंधार पण हळू हळू पसरत होता आणि मी पाहत होतो त्या जीवांकडे ज्यांनी कष्टाने एक रोपटं लावलं होत जे एवढं पसरलं होत.एक यशस्वी व्यक्तिमत्व बनलं होत. मोठ्या शहरामध्ये राहूनसुद्धा संस्कार, तो आदर सगळं काही या रोपट्याने तसंच सांभाळलं होत. कदाचित हे सगळं पाहून या वर्षीची आषाढाची वारी सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असं वाटत असावं त्यांना.


-मोहनिश महंमद खुंटे.
18-07-2016

रविवार, १५ मे, २०१६

यावी अशी संकटे

आता फक्त एक उणीव भासत आहे
गार हवेच्या झुळुकेची...
अंतरातील उष्म निखारे 
शरिर जाळण्यापुर्विच शांत करण्यासाठी...

आलच तर एखाद तुफानी वादळ सुद्धा याव..
द्वेष,मत्सर,अहंकार,अगदीच मुळापासून उपटून टाकण्यासाठी..
मग असच रात्री एखाद शितल चांदण पडाव..
प्रेम ,सहकार्य ,आदर यांना कुशीमध्ये घेण्यासाठी..

मधून मधून असा भयंकर दुष्काळ पडावा..
छावणीवर का होईना आपली माणस जवळ येण्यासाठी..
त्सुनामीच तुफान सुद्धा याव..
सातासुमुद्रा पलीकडच्या आपल्या लोकांना पुन्हा आपल्यात आणण्यासाठी..

विचित्र देहांमध्ये असा भयंकर वणवा पेटावा,
वासनेची भूक करपून टाकण्यासाठी..
स्वाती नक्षत्राचा पाऊस देखील पडावा,
 जिव्हाळ्याचे मोती बनण्यासाठी..

व्हावी कधी गारपीट भरकटलेल्या 
मानवाला मायेची जाणीव होण्यासाठी,
पहाटेच सगळीकडे दव देखील पसराव..
मित्रत्वाच्या कळ्यांना उमलण्यासाठी..


मी तर म्हणतो यावी अशी अनेक संकटे मानवी जीवनात 
माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी..
" चमत्काराची " कधी गरजच पडू नये माणसातील देव पाहण्यासाठी....
माणसातील देव पाहण्यासाठी !!!!


- मोहनिश महंमद खुंटे.
(१७/०४/२०१६)

शुक्रवार, १३ मे, २०१६

..............................आई !



वेदनांचा जीव तू  दाभणाने ओवीला
गरिबीच्या बागेत तुझ्या मोगरा फुलविला...

उन्हाची ना फिकीर, ना न्हवती तमा काट्याची तुला..
देऊन सुख लेकरा  जन्म दुखाचा भोगिला..

दारिद्र्याच्या भयाण माळरानी बीज कष्टाने तू रोविला
चालता काट्या कुट्यातून घामाने पदर तुझा भिजला


अज्ञानाचा डोंगर तूझ्या लेकरासाठी पार केला
अडाणी आईच्या नशिबी तू एक मास्तर घडविला




क्रमश:
- मोहनिश महमंद खुंटे

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?

असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
जोडलेल्या त्या हाताना अन निराश मनांना
तुझ्या दर्शनासाठी ऊन्हात पावसात रांगेत उभे करतोस
ज्यांच्याकडे मात्र VIP पास असतो त्यांच्याच घरी आता तू नांदतोस ..
असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?


             कधीतरी त्यांच्याकडे पण बघ जे आयुष्याला कंटाळून जीव देतात
             तू जन्माला घातलंय आणि तूच जगवशील या भोळ्या आशेने शेवटी तुझ्याच दारी येतात
             अस म्हणतात संकटामध्ये सगळ्यांच्या तू नेहमीच धावतोस ..
             असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
तुझ्यासाठी खरतर ही सगळी लेकर सारखीच ना
पण मग एकाला AC मध्ये आरामात नि दुसऱ्याला भर ऊन्हात राब राब राबवतोस
असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
     
            काळ्या आईच्या कुशीतून सोन पिकाव म्हणून त्या गरीब शेतकऱ्याकडून
            किती घाम गाळून घेतोस?
           ऐन काढणीला आलेल्या पिकामंधी कधी वादळ नायतर जोराचा पाऊस देऊन
           तोंडी आलेला घासच तू हिसाकावतोस
            असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
CELEBRATIONS,PARTIES,ENJOYMENTS अशा विश्वातल्यांच्याच
नशिबी आता नेहमी तू दिसतोस
पायाच्या भेगा,हाताच्या जखमा,मणक्याच कधी दुखण ,फाटलेली कपडे आणि वेदनांचे जीवन
असणार्यांपासून आता लांब का पळतोस ?
असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
             एकीकडे नवनविन सुखसोयींनी भरलेल्या SMART CITY मध्ये
            आजकाल तू वास्तव्य करतोस ..
            एक एक थेंब पावसाची वाट पाहणाऱ्या गरीब लेकरांना
            तू वर्षोनुवर्षे पाण्यासाठी तरसवतोस..
            असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
तुला दोष देतोय किंवा कोणता जाब विचारतोय अस समजून चिडू नकोस
तस सगळच काही तू जाणतोस
तरीपण समजत असून न समजल्याच सोंग तू घेतोस.
"तू " असण्यावरच्या विश्वासावरच इथ तुझी लेकर जगतात ..
नशिबी आलेल्या गरीबीच ,लाचारीच ओझं फक्त तुझ्या दर्शनासाठी वागवतात
थकलेल्या या भाबड्या जीवांशी असा कोणता खेळ तू खेळतोस
असा कसा रे देवा तू श्रीमंतांनाच पावतोस.... ?
             इथ SMART CITY,AC,PIZZA,BURGER तुला कोण मागत नाही,
            अशा गोष्टीनी भागेल अशी कसलीच भूक त्या गरीब जीवांना लागत नाही..
            तू कोणता चमत्कार कर अस देखील आम्ही म्हणत नाही...
पण देवा ..........
श्रीमंतांच्या घरात बसून जर तुझ समाधान झालच असेल तर
गरीबाच्या झोपडीचा उंबरठा जमल तर नक्की बघ ..
कित्येक वर्षे ओसाड पडलेल्या धरणीमाईच्या कुशीत भरघोस पिक पसरून बघ..
दगडच उरलेल्या विहिरीमध्ये पावसाच्या सरी टाकून बघ..
डोळ्यांमध्ये येणाऱ्या आसवांच्या जागी सुखाचे चार क्षण देऊन बघ...




-मोहनिश महंमद खुंटे.
           

     

गुरुवार, ३ मार्च, २०१६

कधी कधी अस वाटत एकदम सगळ छान घडावं..

कधी कधी अस वाटत एकदम सगळ छान घडावं..
रोजच्या तक तकीतून अस एकदम मोकळ व्हाव..


रोज सकाळी उठून आवरून TIME वर तीच बस पकडतोच की..
पण आज थोड LATE उठून जरा उशीराच कामावर पोहचाव..


रोज तेच ते काम शांतपणे करत असताना एकदम ऑफिस मध्ये मोठ्यान गाण म्हणाव
FORMAL ड्रेस रोजच घालतो कि आपण न अचानक आज काहीतरी CASUAL घालून याव...


जेवताना TIFFIN ला बायकोने रोज मेथी,वांग,पालक भराव..
पण आज अचानक आईने चिकन मसाला द्यावं ..


संध्याकाळी थकून घरी येऊन त्याच त्या बातम्या पाहतोच ना.
पण आज मस्त मुलांसोबत गच्चीवर गाण्याच्या भेंड्या आणि लपाछपी खेळावं...


 पाऊस पडला असताना डबक्याच्या बाजू बाजूने सावकाश जातोच कि..
आज मात्र चिंब भिजत त्याच डबक्यातून अगदी पाणी उडवत चालाव ...


रोजच्या गोष्टी तर रोज होतच राहतील ,पण आज अस काहीतरी घडव कि साला जीवनाच गणितच एकदम बदलाव..
तेच ते जीवन जगता जगता आयुष्य कंटाळवाण व्हाव..
पण यार ही जिंदगी तर अशीच राहील आपण मात्र आज अचानक बेफिकीर होऊन उडावं..


..................***............


समाजात अवतीभवती अन्याय छळ पाहून काही पाहिलंच नाही अस दाखवत गुपचूप निघून जातो,
पण आज अचानक त्या अन्याया विरुध्द आपणच आवाज उठवावा अस वाटावं..


आपल्या माणसासाठी आजन्म राब राब राबतोच कि..
आज अचानक कुणा परक्यासाठी  काहीतरी करण्याचा विचार मनात यावं..


सिग्नल वर ५-१० रु. खेळणी ,गुलाब विकणाऱ्या त्या चिमुरड्याकडून एकतरी फुल घेऊन डोक्यावरून त्याच्या प्रेमाचा हात फिरवावा..
रस्त्यावर कटोरी घेऊन बसलेल्याच्या ताटात आज भिक न घालता त्याला पोटभर अन्न द्यावं..

खर आहे ..रोज जगतो त्या आयुष्यातून एक दिवस असापण जागून पाहावा ..
देवाने आपल्यालाच माणूस का बनवलं हा हेतू आपल्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर आलेल्या हास्यातूनच आपल्याला कळावा..


हो ना ..कधी कधी अस वाटत एकदम सगळ छान घडावं..
आपल्याकडे  जे आहे तेवढ्यातच आपण खुश राहावं ..
  ज्या सुखाचा आपण नेहमीच पाठलाग करत आलोय ते शेवटी ते आपल्याच अंतरी मिळावं ..
खरचं.. कधी कधी अस वाटत एकदम सगळ छान घडावं......



- मोहनिश महंमद खुंटे .

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

"प्रेम" नावाचा रोग झालाय तुला .."

आज मीच म्हटल तिला, जा बाई दूर जा माझ्यापासून,
परत भेटायचं पण नाही आपण ,
हळू हळू भेटण ,मग गप्पा बोलण नि हे करता करता
"प्रेम " नावाच व्यसन लागलय तुला........
              ती शांत होऊन म्हणाली , लागू दे रे व्यसन आता काय ,
               सगळच मी तुझ्यातच तर पाहते ,तुझ्यापासून लांब राहून
              काय मिळणार आहे का मला ..?
              मी म्हटल वेडी आहेस तू खरचं ,
              "प्रेम " नावाच व्यसन लागलय तुला.......
                     
जेव्हा भेटलो होतो पहिल्यांदा तेव्हा ती भांडली होती,
चुकून माझ्या पायाची लाथ तिला लागली होती..
नंतर खर तर मीच सॉरी म्हणत चॉकलेट दिल होत तिला ..
घमेंडी पण हुशार अशी काहीतरी वेगळीच दिसली होती ती मला ..
पण आता  "प्रेम " नावाच व्यसन लागल होत  तिला.......
             
              स्वतःची कामे स्वतः करायची नि अभ्यासात सगळ्यात
              पुढे जाण्याची सवय होती तिला ..
              बुजऱ्या मुलींच्यात नसेल कधी पण धिंगाणा मस्ती आवडायची तिला
              पुढे अशीच माझ्यात कशी गुंतली गेली हेच कळाल नाही तीच तिला न माझे मला ..
              पण आता  "प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......


आयुष्याच्या खरया कसोटीमध्ये माझ्यासारखं माझ्यासोबत
गुंतली गेली होती ती ..मी अडकलोय , हरलोय तरी माझ्या सोबत होती ती ..
तिच्या भविष्याच्या विचाराने जाग केल मला ..
आता तिलाच माझ्यापसुन दूर करून जाग कराव हे जाणवलं होत मला कारण ..
"प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......


            आज ठरवलं तोडायची सगळी नाती आणि विसरून जायचं तू मला
            खूप बोललो तिला, डोळ्यातून भावना पाण्यासारख्या
            वाहताना पाहिलं होत मी तिला ..
            मी तुझ्याशिवाय पण खुश राहू शकतो हे खोटच का होईना रागावून सांगितल होत     तिला
           आता करणार तरी काय ना ?
            "प्रेम " नावाच व्यसन लागल होत तिला.......


ती दूर जाऊन आता खूप काल उलटला गेला..
आता फोन नाही मेसेज नाही ,यशाचा तलाव तिचा सुखाने भरला गेला ..
कदाचित माझ्यात अडकण्याच्या शिक्षेतून शेवटी सुटका मिळाली होती तिला ..
एवढ्या वर्षांनी आज तिला पाहिलं यशस्वी होताना आणि आठवल ..
हि तीच होती.... कधीतर "प्रेम " नावाच व्यसन लागल होत जिला.......


         
          अचानक आज आरश्यासमोर उभा असताना समोरून आवाज आला ,
          "मूर्ख आहेस तू !.....अरे खुश राहावी म्हणून दूर केलस तू जिला ,बघ तू तुझ्याचकडे ..
           आता खरच "प्रेम" नावाचा रोग झालाय तुला ..
                                                      "प्रेम" नावाचा रोग झालाय तुला ..
                                                                   
- मोहनिश महंमद खुंटे.
                 

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

valentine Day: प्रेम दिवस

Valentine Day: प्रेम व्यक्त करण्याचा दिवस

काल संध्याकाळी मम्मीने विचारले ,हा Valentine Day काय असतो ? का करतात हा साजरा? तिला सांगताना मी आपल असच म्हटल मला की माहित काय असतो ..पुढे तिला समजून सांगताना म्हटल अग असतो एक दिवस ज्या दिवशी प्रेम व्यक्त केल जात ..मुल मुली एकमेकांना त्यांच प्रेम व्यक्त करतात.ती अजून पुढचं मला काय विचारणार तेव्हा मीच म्हटल काय ग कालच्या मालिकेत काय झाल न कशीबशी माझी सुटका करून घेतली. आता आजकालच्या पिढीचा Valentine Day तिला समजून सांगायला माझ्याकडे कोणतेच शब्द आत्तापर्यंत तरी न्हवते.
गंमतीची बाब अशी आहे कि हे प्रेम व्यक्त करण्यातच काही जणांची जिंदगी निघून गेली.त्यांच्या ह्या साऱ्या भानगडीत साधत ते रेडीमेड ग्रीटिंग्ज वाल्यांच.आता पहिल्या सारख कुठ राहिलंय कि एखादा प्रेमवीर स्वतःच्या भावना एखाद्या कागदावर लिहून आपल्या प्रेयसीला देतो ,आता काय एक मोठ ग्रीटिंग (२००रु च्या पुढे ) घ्यायच ...TO ...FROM या रिकाम्या जागा भरायच्या नि पोहच करून द्यायचं, बिचारी ती मुलगी हे घेऊन खुश होते ,आतील मजकुर वाचून गालातल्या गालात हसते आणि होकार देते पण , मी तर म्हणतो तो होकार खरा तर ह्या सुंदर ओळी लिहिणाऱ्या त्या कवीलाच दिला गेला असेल ,बिचाऱ्याने कुणासाठी तरी लिहिलेल्या असतील पण REJECT झाल्याने दुसरयासाठी का होईना उपयोगी आल्या.
दोघांच एकमेकांकडे पाहण,चोरून भेटण ,चोरून बोलण सुरु होत, सगळ सुरळीत चालू असताना कुठ तरी माशी शिंकते. घरी समजणं म्हणा ,अभ्यासच तेन्सिओन म्हणा ,करिअर च म्हणा अशा कोणत्यातरी कारणाने दोघांच BRECKUP होत...आता सगळ बंद होऊन जात. दिवसामागून दिवस जायला लागतात आणि परत नवीन वर्षातील आनंद,नंतर येणारी थंडी संपत संपत पुन्हा १४ फेब्रुवारी यायला लागतो ,गल्ली अन गल्ली ,दुकाने परत एकदा प्रेमाच्या लाल रंगाने अगदी बहरली जातात व मघाशी तुटलेली मन ,बिख्रलेली स्वप्न हातात परत एक मोठस  रेडीमेड ग्रीटिंग्ज घेऊन नवीन जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात.

गुलाबाच्या त्या नाजूक पाकळीसारख प्रेम असत ...
टेडी बिअर च्या त्या मऊ मऊ कापसापेक्षा पण लुसलुशीत प्रेम असत ....

सोडवायला गेलात तर अडकून हरवून जाल या विचित्र कोड्यात ..
कारण ..थोरामोठ्यांनाही शब्दात वीणता न येणाऱ्या भावनेचं सुंदर अस घरट प्रेम असत ...


To be continue



रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

"त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत........."

   ( शिक्षण संपवून बाहेरून अगदी सोप्या वाटणाऱ्या या दुनियेत आपण पडतो..तेव्हा सुरु होतो लपंडाव यश आणि अपयशाचा ..यात बहुदा अपयशच जिंकत जात आणि हरत जातो आपणही,आपल्या यशाला दूरवर पाहत असताना...पण हे मिळालेलं अपयश हा आजचा भाग असतो कारण आपल्याला उद्या परत धावायचं असत मिळवण्यासाठी "यश" ...जे फक्त असत तूमचं !! )



           "त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत........."



      "मावळणाऱ्या सूर्याकडे पाहताना जर तुला जाणवल की आजचा दिवस व्यर्थ गेला तर ........
तर ....आज झोपताना मनात तू एकच गोष्ट ठेव उद्याचा उगवणारा सूर्य नव्या उमेदीने पहायचाय तुला ! आज  काही मिळवलं नाही म्हणून निराशेने खचून जाऊ नकोस कारण..
कारण ...उद्या काय करायचय हे ठरवायचं अजून तुला !"

     " आज तू जे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत,धावपळही केली पण ..काहीच मिळाल नाही अस समजून तुझ सामर्थ्य कमी होऊ नको देऊस कारण ..
कारण ..आज जे काही तुला मिळाल नाही कदाचित उद्याचा दिवस त्याहूनही सुंदर अस काहीतरी तुझ्यासाठी घेऊन येणार असेल.."

     "आज जेव्हा तू मोकळ्या हाताने घरी यायला निघशील तेव्हा नक्कीच तुला वाटेल समोर फक्त अंधार आहे वाट तर कुठेच दिसत नाही ..पण जिद्द तुझी सोडू नकोस कारण..
 कारण ..उद्या तुला त्याच अंधारामधूनपण वाट सापडेल जेव्हा तू याच जिद्दीने पुन्हा चालायला लागशील.."

   "एव्हाना तुझ्यात असलेल्या अफाट शक्तीचा तुला अंदाजही आला नसेल..पण तो तूच आहेस जो अशक्य ते शक्य करू शकशील .
   आज केलेल्या प्रयत्नातून यश भलेही नसेल मिळाल पण अपयश मात्र पचव.. कारण..

कारण...तुझ्या रक्तात लढण्याची ती वीज अजूनही वाहत आहे जी तुला उद्या नक्कीच पोहचवेल त्या ठिकाणी जिथे जाण्यासाठी आज तू चालत आहेस मोकळ्या हाताने ..

त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत.......... त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत !!!"


-मोहनिश महंमद खुंटे.

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............

"प्रेम" या शब्दाला काही बंधनं नाहीत, कोणत्या अटी नाही.....ते फक्त समजून घ्यायचं न वाहत जायचं आपण त्या मध्ये बिनधास्त कारण थांबायला इथे कोणताच ब्रेंक नसतो न नसतो थांबवायला कोणता स्पीडब्रेकर !!

नुकतेच कॉलेज मध्ये प्रवेश केलेल्या एका तरुण मुलाच प्रेम आज कवितेतून मांडत आहे, तुमच्या  जीवनाशी निगडीत कोणत्या गोष्टी जाणवल्याच तर निव्वळ एक योगायोग समजावा .
                 
                           

                        सांग ना सखे खरच अस कधी होईल का ?..............                          

प्रिय सखे ,

     पहिल्या पावसाच्या त्या सरीमध्ये चिंब भिजताना 
     माझ्यासवे पावसात भिजशील का ?
     खडकवासला धरणा जवळ ते गरम मकेच कणीस 
    माझ्यासोबत खाशील का ?
                 सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..............
    

                                                 
                                         गुलाबी थंडी मध्ये हात माझा हातात घेऊन 
                                         दूर दूर पर्यंत चालशील का ?
                                         मग असाच पुढे कुठेतरी माझ्यासोबत गरम गरम
                                         कांदेभजी अन वडापाव खाशील का ?
                                                           सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?...............

      जानेवारी महिन्यात पडणाऱ्या गर्द अशा धुक्यात 
      बाईक वरून माझ्यासोबत फिरायला येशील का ?
      आणि असाच पुढे जाऊन कुठेतरी एका टपरीवर 
     गरम चहाचा स्वाद माझ्यासोबत घेशील का ?
                     सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..............

   

                                                कॉलेज मध्ये लेक्चर चालू असताना तू पहिल्या बेंच वरून 
                                                 हळूच माझ्याकडे चोरून पाहशील का ?
                                                 नि त्याचवेळी मी ही तुझ्याकडे पाहत असताना 
                                                 तुझ्या त्या गालावरच्या खळीने मन माझ खुलवशील का ?
                                                                   सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..............


      परीक्षेच्यावेळी रात्री बेरात्री कॉल/मेसेज करून 
      अभ्यासाची तयारी किती झाली, काय काय महत्वाच करू अस सांगशील का ?
     रिझल्ट माझा माझ्यासमोर पाहून थोड वाचल असत तर पास तरी झाला असता !
       अस हक्काने म्हणशील का ?
                         सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..................
     
   

                                               कॉलेजच्या DAYS मध्ये माझ्या वेगवेगळ्या विचित्र अवतारात 
                                               तू तुझे छान साडी घातलेल्याचे फोटो माझ्यासोबत काढशील का ?
                                              GATHERING ला जेव्हा मी स्टेज वर एखाद गाण गायिल तेव्हा 
                                             उभ राहून मोठ्याने टाळ्या वाजवशील का ?
                                                                   सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..............

  
           उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तू न मी असा मस्त एखादा 
           LOVE STORY असलेला पिक्चर थिएटरमध्ये पाहशील का ?
           आणि पुढे उन्हातून चालून आल्यावर आले लिंबू टाकून
           उसाचा रस माझ्यासोबत पेशिल का ?
                           सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?................


                                                        TRIP ला जाताना बस मध्ये तुझ्याशेजारच 
                                                       सीट माझ्यासाठी पकडून ठेवशील का ?
                                                       मग रात्री छानशी ROMANTIC गाणी एकाच
                                                       HEADPHONE मध्ये माझ्यासोबत ऐकशील का ?

                                                                      सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?..................



आता एवढ सगळ जर तू केल आहेसच तर
स्वप्नातून माझ्या बाहेर येऊन खरोखरच कुठेतरी भेटशील का?

आता एवढ सगळ जर तू केल आहेसच तर
स्वप्नातून माझ्या बाहेर येऊन खरोखरच कुठेतरी भेटशील का?...................

मनातून आलेल्या माझ्या कवितेला "प्रेमाने" नाव एखादे देशील का...............

नाव एखादे देशील का? .................

सांग ना  सखे खरच अस कधी होईल का ?...............




मोहनिश महंमद खुंटे.
(second yr ला लिहायला घेतलेली कविता आता पूर्ण करत आहे.)