"आई" शब्द जेवढा महान आहे तेवढंच महान आहे आई होणं. आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ जन्माला
येई पर्यंत एक वेगळीच आतुरता प्रत्येक आईच्या मनात असते. ९ महीने आणि ते प्रत्येक दिवस हि आतुरता वाढतच जाते आणि कधी कधी हा जीव आई म्हणून हाक मारतोय याचे भास वाटायला सुरुवात होते....हेच भास आणि हीच आतुरता आई होणाऱ्या माझ्या मैत्रिणीच्या मनातून कवितेमधून मांडत आहे.....
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई !
देहातून माझ्या हळूच हाक येई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई
अंगणातील मोगऱ्याच्या कळीचे होई फुल
हालचालीतून हा जीव देई त्याच्या येण्याची चाहूल
सायंकाळच्या वेळी वासरू गायीजवळ जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई
बिजातूनी अंकुर बनून येईल तो तान्हा
चार भिंतीच्या घरट्यात रांगेल माझा कान्हा
मिठीत त्याला घेण्या मग जीव करी घाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई
बोबड्या शब्दांना ऐकण्या आतुरले माझे कान
अवतीभोवती त्याच्या असण्यात हरपून जाई भान
पोट भरण्या लेकरा ती दोन घास कमी खाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई
पणतीच्या तेलासोबत आजन्म जळतात वाती
मडक्याच्या घडण्यासाठी जळून घेते माती
घरट्यात नसता बाळ पाखरू घाबरून जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई
- मोहनिश महंमद खुंटे
२७-१२-२०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा