मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

"आई" शब्द जेवढा महान आहे तेवढंच महान आहे आई होणं. आई होण्याची चाहूल लागल्यापासून ते बाळ जन्माला   
येई पर्यंत एक वेगळीच आतुरता प्रत्येक आईच्या मनात असते. ९ महीने आणि ते प्रत्येक दिवस हि आतुरता वाढतच जाते आणि कधी कधी हा जीव आई म्हणून हाक मारतोय याचे भास वाटायला सुरुवात होते....हेच भास आणि हीच आतुरता आई होणाऱ्या माझ्या मैत्रिणीच्या मनातून कवितेमधून मांडत आहे.....

इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई !


देहातून माझ्या हळूच हाक येई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

अंगणातील मोगऱ्याच्या कळीचे होई फुल
हालचालीतून हा जीव देई त्याच्या येण्याची चाहूल
सायंकाळच्या वेळी वासरू गायीजवळ जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

बिजातूनी अंकुर बनून येईल तो तान्हा
चार भिंतीच्या घरट्यात रांगेल माझा कान्हा
मिठीत त्याला घेण्या मग जीव करी घाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

बोबड्या शब्दांना ऐकण्या आतुरले माझे कान
अवतीभोवती त्याच्या असण्यात हरपून जाई भान
पोट भरण्या लेकरा ती दोन घास कमी खाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई

पणतीच्या तेलासोबत आजन्म जळतात वाती
मडक्याच्या घडण्यासाठी जळून घेते माती
घरट्यात नसता बाळ पाखरू घाबरून जाई
इवलेसे पिलू आतून मज बोलवे आई


- मोहनिश महंमद खुंटे
२७-१२-२०१६



सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..............................

असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..............................

त्याचा जन्म झाला तेव्हा ते सगळे म्हणाले नक्कीच काहीतरी नाव कमवेल असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


पुढे अवघ्या 3-4 वर्ष मध्ये तो इतका बोलायचं की ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा नेता बनणार असं
त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


शाळेत जायला लागल्यावर घरी रोज न सांगता अभ्यासाला बसायचं,सगळ्या विषयात उत्तम मार्क्स मिळवायचा तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा Doctor बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


दहावीच्या वर्षात अभ्यासासोबतच प्रेम करायला लागला, जेव्हा हे समजलं तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच
पुढे जाऊन हा प्रेम विवाह करणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


पुढचं शिक्षण घ्यायला शहरामध्ये कॉलेजला जाऊ लागला, मित्रांच्या सोबतीतून घरी भांडण घेऊन यायला लागला सुजलेल्या थोबाडाकडे पाहून तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा गुंड बनणार असं त्याच्या
तोंडाकडे बघून वाटतंय..


शिक्षण सार संपवून जेव्हा नोकरीसाठी वण वण भटकून मोकळ्या हाताने घरी यायचा तेव्हा ते सगळे
म्हणायचे असाच बोंबलत बसला तर नक्कीच पुढे जाऊन बेरोजगार होणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय
..


बेरोजगारीवर मात देऊन कष्टाची सोबत घेऊन IT कंपनी मध्ये जॉब करत असतो ,प्रामाणिकपणा त्याचा पाहून
ते सगळे म्हणायचे नक्कीच पुढे जाऊन हा मॅनेजर बनणार असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..


कंपनी मधल्याच एका मुलीशी लग्न करून तो संसार त्याचा सुखाने सजवू लागतो, असच अचानक हसरा त्याचा चेहरा
पाहून ते सगळे म्हणायचे नक्कीच हा बाप बनणार आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

नोकरीतील उच्च पदाचा फायदा आणि त्याची मेहनत त्याला परदेशात नोकरीसाठी संधी देते, तो ही बायको
मुलांसोबत तिकडे जायला तयार होतो तेव्हा ते सगळे म्हणायचे नक्कीच हा आई बापाला वृद्धश्रमात टाकणार
आहे असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

एवढं सगळं घडत असताना त्याचे जीवन तो आंनदाने जगतच असतो, ते सगळे असतातच त्याच्या चांगल्या
वाईटावर फक्त बोलणारे, फुकटचे उपदेश देणारे पण तो मात्र जात राहतो पुढे पुढे या सगळ्यांशी कानाडोळा करत.ते सगळे काय म्हणतील याचा विचार न करता ! चांगलं झालं तरी ते सगळे बोलणारच आणि वाईट झालं  तरी ते सगळे बोलणारच!!

मिळालेले आयुष्य समाधानाने जगून शेवटी तो या नश्वर दुनियेचा निरोप घेतो,देहापासून जरी त्याचा आत्मा त्याला सोडून गेला होता तरी समाधानी चेहऱ्याकडे पाहून ते सगळे म्हणायचे झोपेतून हा उभा राहील असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..असं त्याच्या तोंडाकडे बघून वाटतंय..

म्हणून एखादी गोष्ट करताना कुणी काय म्हणेल याचा जास्त विचार न करता ती गोष्ट कशाप्रकारे जास्त चांगली होऊ शकेल याचा विचार करावा कारण ,ते सगळे तुम्हाला नेहमीच भेटतील तुमच्या आसपास जे फक्त बोलणार्यांची भूमिका बजावत असतात !!!


- मोहनिश महंमद खुंटे.

12-12-2016