सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी.!

अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी.!
मनातल्या बऱ्याच कोंडून पडलेल्या भावना मोकळ्या होताना पाहायचं असल्यास..


गर्दीतून कधी तो चेहरा दिसावा ज्याला अनपेक्षितपणे का होईना नजर शोधत राहते नेहमी!
कानावर अचानक आपल्याच नावाचे शब्द घुमावे जेव्हा त्याच्याकडून आपले नाव ऐकायला मिळावे असं कधी वाटल्यास..


फोन आलाच कधी अनोळखी नंबर वरून तर त्यातील शेवटचे काही नंबर अगदी सारखेच निघावे त्याच्या असणाऱ्या जुन्या मोबाइल नंबर सारखे!
मग मुद्दामून  तेच ते  मेसेजेस  वाचावे जुन्या आठवणींना उजाळा द्यावा वाटल्यास..

आपल्याला आवडत असणाऱ्या कित्येक रंगांपेक्षा मग कधी त्याला आवडणाऱ्या रंगामध्ये रंगून जावं..!
मग जुना झाला असला तरी तोच ड्रेस घालावा त्याच्याकडून मिळाल्याला त्या कॉम्प्लिमेंट पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटल्यास ..


एकटं वाटायला लागलं तर कधी जाऊन बसावं त्या जागी जिथं आधी कधी बसून तासंतास गप्पा मारल्या होत्या त्याच्यासोबत..!
शांत मनाने मग गवताच्या काड्या तोडत बसावं  मुजलेल्या त्या गमती जमती खोदून काढू वाटल्यास..
..
विसरला असेल तोही मला असं आपलंच आपल्याला समजावत डोळ्यातील अश्रूंना मोकळेपणाने वाहू द्यावं..!
मग थोड्या वेळाने सावरताना स्वतःनेच स्वतःलाच , असं मनात यावं ,


“अश्रूंसोबत जगताना नेमकी ओळख व्हावी स्मित हास्याशी..”


-मोहनिश महंमद खुंटे
09-09-2016